Archive for कामगार विभागाच्या सचिव कविता गुप्ता

लोखंडेंचे नाव श्रम विज्ञान संस्थेला

म. टा. खास प्रतिनिधी

भारतातील कामगार चळवळीचे जनक आणि सत्यशोधक चळवळीतील बिनीचे नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांची स्मृती चिरंतन राहण्यासाठी परळच्या महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेला त्यांचे नाव येत्या सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखाली शिक्षण आणि संशोधन यासंबंधी कार्यरत असलेली सदर संस्था राज्यामध्ये आणि राज्याबाहेर देखील कामगार क्षेत्रातील एक प्रथितयश पदव्युत्तर शिक्षणसंस्था म्हणून नावाजली जाते. येत्या ९ फेब्रुवारी रोजी रा. लोखंडे यांच्या स्मृतिदिनी संस्थेचा नामकरण समारंभ सकाळी १० ते ११.३० या वेळात कामगारमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार असून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री चंदकांत हंडोरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी, गृह राज्यमंत्री नितीन राऊत, खासदार मोहन रावले, आमदार दगडूदादा सकपाळ, कामगार विभागाच्या सचिव कविता गुप्ता, संस्थेचे संचालक डॉ. राजन तुंगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कामगार भवनाचे उद्घाटन
याच दिवशी दुपारी ३ वाजता वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील इ ब्लॉक येथे कामगार भवनाचेही उद्घाटन होणार आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, व कामगार विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या या कामगार भवनात विविध औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालक इत्यादींची कार्यालये असतील. कामगार मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून वैद्यकीय राज्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी, खासदार प्रिया दत्त, आमदार जनार्दन चांदूरकर तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave a comment »