Archive for election

रेल्वेच्या क्रेडिट सोसायटीवर ‘एनआरएमयू’ चे वर्चस्व

 

मुंबई – मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) शिवसेना रेल्वे कामगार सेना व सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचा पाडाव करून यंदाही सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या निवडणुकीत "एनआरएमयू’चे एकूण 162 पैकी 95 उमेदवार निवडून आले आहेत.
मध्य रेल्वेच्या पतसंस्थेची निवडणूक 18 जून रोजी 56 भागांत पार पडली. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1913 मध्ये सुरू केलेल्या या संस्थेवर गेली बरीच वर्षे ‘एनआरएमयू’चे वर्चस्व राहिले आहे. वर्षाला 800 कोटींची उलाढाल असलेल्या या सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉंग्रेसप्रणीत ‘सीआरएमयू’ व शिवसेनेची रेल कामगार सेना यांनी युती केली. निवडणूक जिंकता यावी यासाठी मतदानाच्या वेळी सीएसटीतील यार्ड मतदान केंद्रावर ‘एनआरएमयू’च्या सीटीआरचे सचिव केनडी व यार्डचे सेक्रेटरी रवींद्र शिंदे यांना शिवसेना रेल कामगार सेना व ‘सीआरएमयू’चे विद्याधर पांगे व राजन सुर्वे यांनी मारहाण केली होती; परंतु ‘एनआरएमयू’ने परिवर्तन पॅनेलचा पाडाव करून पतसंस्थेतेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

 

रेल्वेच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीला गालबोट

मुंबई – मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. या पतसंस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना रेल कामगार संघ व सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या (सीआरएमयू) काही व्यक्तींनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या (एनआरएमयू) व्यक्तींना मारहाण करून निवडणुकीच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने गालबोट लागले.
मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्था आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था मानली जाते. एका इंग्रज अधिकाऱ्याने 1913 मध्ये सुरू केलेल्या या संस्थेवर गेली बरीच वर्षे "एनआरएमयू’चे वर्चस्व राहिले आहे. वर्षाला 800 कोटींची उलाढाल असलेल्या या संस्थेच्या सोसायाटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉंग्रेसप्रणीत सीआरएमयू व शिवसेनेची रेल कामगार सेना यांनी युती केली. पतसंस्थेची निवडणूक जिंकता यावी यासाठी मतदानाच्या वेळी सीएसटी येथील यार्ड मतदान केंद्रावर "एनआरएमयू’च्या सीटीआरचे सचिव केनडी व यार्डचे सेक्रेटरी रवींद्र शिंदे यांना शिवसेना रेल कामगार सेना व "सीआरएमयू’चे विद्याधर पांगे व राजन सुर्वे यांनी मारहाण केली. हा प्रकार सकाळी मतदानाच्या वेळी घडल्याने रात्रपाळी करून मतदान करायला आलेले कर्मचारी मारामारी पाहून घाबरून निघून गेले. त्याचा परिणाम मतदानावर झाला. एकूण 1200 मतदारांपैकी 700 मतदारांनी सायंकाळपर्यंत मतदान केले. मारहाण करणाऱ्याची तक्रार जीआरपी पोलिसकडे करण्यात आली असून, मतदान झाल्यानंतर या संदर्भातली चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a comment »