Archive for nano

‘नॅनो’ला मुहूर्त २३ मार्चचा!

"नॅनो’चा लॉंचिंग सोहळा २३ मार्च रोजी मुंबईतील "ताज हॉटेल’मध्ये अध्यक्ष रतन टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई – बहुप्रतीक्षित लाखाची "नॅनो’ अखेर सुमारे सहा महिने उशिराने भारतीय बाजारात दाखल होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात "नॅनो’ शोरूममध्ये उपलब्ध होईल; तर याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात "नॅनो’साठी बुकिंग करण्याची सोय उपलब्ध होईल, असे "टाटा मोटर्स’ने आज अधिकृतररीत्या जाहीर केले. "टाटा’च्या "नॅनो’चा लॉंचिंग सोहळा २३ मार्च रोजी मुंबईतील "ताज हॉटेल’मध्ये अध्यक्ष रतन टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्‍यता आहे.
रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार म्हणून एक लाख रुपयांची "नॅनो’ गेल्या वर्षी १०  जानेवारी रोजी नवी दिल्लीच्या "ऑटो शो’मध्ये सादर करण्यात आली होती. त्याच वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये "नॅनो’ बाजारात आणण्याचा संकल्प टाटा यांनी यानिमित्ताने सोडला होता; मात्र राजकीय वादात कंपनीचा सिंगूर (पश्‍चिम बंगाल) येथील कारनिर्मिती प्रकल्प बंद पडल्याने, त्याचे सादरीकरण लांबले होते.
आज मात्र कंपनीने प्रसिद्धिपत्रक काढून "नॅनो’ मुंबईत २३ मार्च रोजी समारंभपूर्वक सादर करण्यात येईल, असे घोषित केले. तसेच कंपनीच्या वितरकांकडे "नॅनो’ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध असेल आणि "नॅनो’साठी याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बुकिंग करता येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनी "नॅनो’च्या उपलब्धतेसाठी वितरकांचे जाळे वाढविण्याच्या तयारीत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात १,५०० नॅनो उपलब्ध?
"टाटा मोटर्स’च्या "नॅनो’ची सध्या उत्तराखंड येथील पंतनगर प्रकल्पातून निर्मिती करण्यात येत आहे. त्याचबरोबर कंपनीच्या पुण्यातील प्रकल्पातही "नॅनो’च्या जुळवणीचे काम सुरू आहे. कंपनीच्या कारखान्यात सध्या ९०० "नॅनो’ तयार आहेत. उर्वरित महिन्याच्या कालावधीत आणखी ६०० "नॅनो’ "टाटा मोटर्स’ला तयार कराव्या लागणार आहेत. कंपनीच्या पंतनगर प्रकल्पाची दिवसाला २५ ते ३० वाहननिर्मिती क्षमता पाहता, हे उद्दिष्ट सहज पूर्ण होण्यासारखे आहे. यानंतर कंपनी गुजरातमधील साणंद येथून "नॅनो’चे उत्पादन सुरू करील; मात्र वर्षाला सुमारे अडीच लाख वाहननिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प यंदाच्या ऑक्‍टोबर-नोव्हेंबरनंतरच सुरू होण्याची शक्‍यता आहे.
– २३ मार्चला मुंबईत सादर होणार
– एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शोरूममध्ये
– एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून बुकिंग
– किंमत एक लाख ३० हजारांच्या पुढे
– बुकिंगसाठी ७० हजार मोजावे लागणार
– निवडक वितरक, स्टेट बॅंकेत सोय उपलब्ध

Leave a comment »