Archive for नेताजी सुभाषचंद

मोरू, मोरूचा बाप आणि भारतीय ‘प्रजासत्ताक’!

मोरू कडाडला, ‘प्रजासत्ताक, कसले प्रजासत्ताक?… प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का तुम्हाला? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजेने, प्रजेचे, प्रजेसाठी चालवलेले राज्य. आहे इथे प्रजेची सत्ता? चालते इथले राज्य प्रजेसाठी? ही सत्ता प्रजा चालवते?…’
अख्खा आठवडा लोटला; बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस, नेताजी सुभाषचंदांची जयंती हे सारे दिवस आले आणि गेले. भारताचा प्रजासत्ताक दिन अगदी उद्यावर येऊन ठेपला. चाळीत जोरदार तयारी सुरू झाली. घराघरात दरडोई गणती करून वर्गणी जमा होत होती. त्यासाठी चाळीतले शूर शिपाई सकाळपासूनच जोमाने कामाला लागले होते. त्यामुळे चाळीतली गजबजही वाढली होती. वातावरण उत्साहाचे होते.
मोरू मात्र तसाच बिछान्यात निपचित पडला होता. डोळ्यावर ऊन यायला लागले, म्हणून त्याने मोठ्या कष्टाने कूस बदलली आणि सूर्यावर उपकार केल्याच्या थाटात त्याने डोक्यावर पांघरुण ओढले. मोरूचा बाप जवळच खुचीर्त बसून पेपर वाचता वाचता मोरू उठण्याची वाट पाहात होता. त्याची आशा फळण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हात तो अखेर खुचीर्तून उठला आणि बालमानसशास्त्रातील धड्यांमध्ये लिहिल्याप्रमाणे आवाजात शक्य तितके मार्दव आणण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, ‘मोरू, बेटा ऊठ. बघ, पूवेर्ला सूर्यनारायणाचे आगमन झाले आहे. त्याच्या सोनेरी किरणांच्या छटांनी विश्व व्यापून टाकले आहे… वगैरे वगैरे’. मोरूचा बाप बराच वेळ असे काही तरी लहानपणच्या कवितांच्या वर्णनांत वाचलेले बोलत होता. अखेर मोरूच्या बिछान्यात हालचाल दिसली. ती पाहून मोरूचा बाप गहिवरला, ‘अरे वा! मोरू, उठतोस तर’. मोरू पुटपुटला, ‘सूर्य रोजच उगवतो. रोजच त्याच्या सोनेरी किरणांच्या छटांनी जग मोहरतं. आजच विशेष काय? मला झोपू द्या. तुमची ती प्रभातगीतं आईला ऐकवा…’
पण मोरूच्या बापानं धीर सोडला नाही. त्याने बिछान्यापाशी खुचीर् ओढली आणि आवाजातील मार्दव कायम ठेवत तो म्हणाला, ‘मोरू, अरे, आजचा दिवस महत्त्वाचा. २६ जानेवारी १९५०ला अशाच सकाळी भारतीय जनतेने स्वतंत्र देशाच्या राज्यघटनेचा स्वीकार केला आणि एका भव्य प्रजासत्ताकाचा जन्म झाला. त्या घटनेला उद्या ५९ वषेर् पूर्ण होणार आणि भारतीय प्रजासत्ताकाचा हीरकमहोत्सव सुरू होणार. तो दिवस अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलाय. म्हणून आजची सकाळ महत्त्वाचीच…’ आपल्या भावस्पशीर् भाषणाचा मोरूवर काय परिणाम होतोय, हे पाहण्यासाठी मोरूचा बाप बिछान्याकडे टक लावून पाहू लागला.
कूस न बदलता मोरू कडाडला, ‘प्रजासत्ताक, कसले प्रजासत्ताक?… प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का तुम्हाला? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजेने, प्रजेचे, प्रजेसाठी चालवलेले राज्य. आहे इथे प्रजेची सत्ता? चालते इथले राज्य प्रजेसाठी? ही सत्ता प्रजा चालवते?…’ आपल्या मुलाच्या मनात आततायी विचार जागे होत असल्याचे जाणवल्याने मोरूचा बाप चरकला. पण त्याने धीर सोडला नाही.
‘ मोरू, आपण दर पाच वर्षांनी मतदान करतो. या मतांवरच तर आपले लोकप्रतिनिधी निवडून येतात. ते आपले सरकार निवडतात. हे सरकार दर पाच वर्षांनी, किंवा अधुनमधून निवडणुकांद्वारे पुन्हा पुन्हा जनतेला सामोरे जाते आणि नव्याने कौल घेते. म्हणजेच हे प्रजेचे, प्रजेसाठी चाललेले सरकार नाही काय?’ आपण हुकमाचे पान टाकून मोरूला गारद केले, याचे छद्मी हास्य मोरूच्या बापाच्या चेहऱ्यावर विराजमान होणार, तोच आतापर्यंत आडवा असलेला मोरू चादर झटकून देऊन बिछान्यातच बसला.
मोरू उठला, हा मोरूच्या बापाचा विजयच होता. पण मोरू त्वेषाने म्हणाला, ‘आम्ही देतो आमचे लोकप्रतिनिधी निवडून? तसे असते, तर निवडणुकीच्या आदल्या रात्री लुगडी, धोतरजोड्या, दारू आणि पाचशेच्या नोटा वाटण्याची गरज का पडली असती? बरे, दारोदार फिरून मतांचा जोगवा मागणारे हे दास हनुमान मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी वीर हनुमान का बनतात? पुढची पाच वषेर् ते कुठे गायब होतात? ते पोलिस स्टेशनात गंुडांना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करताना आणि बिल्डर्सबरोबर एफएसआय वाढवून घेण्याच्या योजना आखतानाच का दिसतात? मुंबईत प्रलय झाला, तेव्हा ते कुठल्या बिळात शिरून बसतात? आणि अतिरेक्यांचा हल्ला झाला, तेव्हा तोंडे का लपवतात? ते प्रजेसाठी कारभार करतात, तर यूएलसीचा कायदा बहुमताच्या जोरावर कसा संमत होतो? आणि एका भ्रष्ट न्यायमूतीर्विरुद्धच्या अभियोगाच्या कारवाईविरुद्ध मतदान कसे होते? ‘पोटा’चा आवश्यक कायदा केवळ राजकारण म्हणून बहुमताच्या जोरावर कसा रद्द होतो? संसद भवनावर हल्ल करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रह धरत नाहीत पण स्वत:चे वेतन व भत्ते वाढवण्याची विधेयके कशी बिनविरोध संमत होतात? लोकसभेत सर्वांसमक्ष नोटांची बंडले ओतली जातात, तरी दोषी कोण याचा पत्ता मात्र लागत नाही… ही सगळी प्रजेच्या राज्याची लक्षणे आहेत का, बाबा?’
मोरूच्या बापाला हे बाऊन्सर चुकवणे कठीण जात होते आणि ते खेळणे तर अशक्य होते. पण तरीही मोरूच्या बापाने पराभव मान्य केला नाही. ‘मोरू, भारतीय प्रजासत्ताक अद्याप नवे आहे. ब्रिटिश लोकशाहीला चारशे वर्षांची, तर अमेरिकन लोकशाहीला दोनशे वर्षांची परंपरा आहे. आपले आसपासचे देश पाहा. नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तान या साऱ्या देशांच्या राज्यघटना पाहा. त्या किती वेळा बदलल्या? आपली घटना ५९ वषेर् टिकली. हे घटनेचे सार्मथ्य आणि राज्यर्कत्यांचे कसब नाही का?’ मोरूच्या बापाचा सवाल बिनतोड होता.
पण मोरू बापाइतकाच हट्टी आणि पेटलेला होता. त्याचा युक्तिवाद पुढे सुरू झाला. ‘बरोबर आहे, १९५० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली, तीच आजही आहे. पण ती खरेच तशीच आहे का? या घटनेत शंभराहून अधिक सुधारणा झाल्या. अनेक कलमे गळली, अनेक नवी आली, काही दुरुस्त झाली. तरीही तीच घटना कायम आहे, असे सांगूत तुम्ही कोणाची फसवणूक करता? जगाची की, तुमची स्वत:चीच? ५९ वषेर् घटना टिकली, असे मानले, तरी त्यामुळे कोणाचे भले झाले? गरीब गरीबच राहीला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. समतेच्या आणभाका घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला रिझवेर्शनच्या जाती वाढवण्याच्या मागणीला राजकारण म्हणून पाठिंबा द्यायचा? आथिर्क विषमता वाढत चालली, सुशिक्षित बेकारांच्या संख्येत वाढ झाली, २१वे शतक उजाडले, विज्ञानाची प्रगती झाली, असे सांगितले जाऊ लागले, तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतच राहिल्या; हातांना काम नाही आणि कामाला मोल नाही. तरी आमची प्रगती झाली असे मानायचे, कारण काय, तर सेन्सेक्स वधारला. मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला, तर तो करणाऱ्या अजमल कसाबला न्यायालयात वकील मिळवून देण्यासाठी काहींची निर्लज्ज धडपड. का? तर म्हणे घटनेत प्रत्येकाला न्यायालयात स्वत:चा बचाव करण्यासाठी वकील देण्याची सरकारची जबाबदारी आहे. ज्याने भारतीय भूमीत घुसून निरपराध नागरिक व पोलिसांवर गोळ्या झाडल्या, त्याला कायद्याचे संरक्षण आणि गरीब मात्र वकिलाची फी देण्याची ऐपत नाही, म्हणून न्यायापासून वंचित, असे जर घटनेच्या नावाखाली होत असेल, तर काय करायचे?’
मोरू बापाकडून उत्तराची अपेक्षा करत होता, पण सारे कसे शांत शांत! आपला बाप अचानक अदृश्य झाल्याचे मोरूच्या ध्यानात आले. त्याने इथे तिथे शोधले, तर मोरूचा बाप मोरूच्याच अंथरुणात शिरून डोक्यावरून पांघरुण ओढत आपला चेहरा लपवत होता.
(Mah.Times)

Leave a comment »