Archive for Mini Train

माथेरान मिनी ट्रेनची ट्रॅक्‍टरला धडक, पर्यटक-कर्मचारी बचावले

 

सकाळ वृत्तसेवा

माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन अपघातानंतर असे कोसळले होते. ट्रॅक्‍टरची झालेली अवस्था. (छायाचित्र- सकाळ छायाचित्र सेवा)

माथेरान – माथेरानवरून नेरळकडे निघालेल्या मिनी ट्रेनला शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. या अपघातात मिनी ट्रेनमधील साठ पर्यटक आणि नऊ रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले आहेत.

दीड महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात आहे. नेरळ पेट्रोल पंपासमोर कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील क्रॉसिंगवर गेटमन नसल्याने दुसऱ्यांदा हा अपघात घडला. या अपघातात धडक बसलेल्या ट्रॅक्‍टरचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची नोंद घेण्याची तसदी रेल्वे पोलिसांनी घेतली नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कर्जत रेल्वे पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे.
आज मिनी ट्रेनमधून ६० पर्यटक प्रवासी प्रवास करीत होते. माथेरान येथून ही ट्रेन सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी सुटली. नेरळ स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावरील १२ क्रमांकाच्या क्रॉसिंगवर या मिनी ट्रेनची धडक कर्जतकडून नेरळकडे जाणाऱ्या मातीने भरलेल्या मालवाहू ट्रॅक्‍टरला बसली. क्रॉसिंगवरील गेटवर लोखंडी साखळ्या लावण्यासाठी रेल्वेचा गेटमन नसल्याने हा अपघात घडला. या अपघातात मिनी ट्रेनची धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅक्‍टर २०-२२ मीटर लांब फेकला गेला. त्याच वेळी मिनी ट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरले. मिनी ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात दोन, तर दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात ५६ प्रवासी होते.
घाबरलेल्या पर्यटकांनी अपघातानंतर दीड कि.मी. अंतर सामानासह चालत नेरळ गाठले. नेरळ पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे राज्यमार्ग बंद झाला होता. तो पोलिसांनी तासानंतर मोकळा केला.
दरम्यान, या घटनेचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ म्हणून पनवेलचे प्रांताधिकारी मुकेश काकडे, नायब तहसीलदार रवींद्र कुंटे, सहायक पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्‍टरचा चालक राम मुकणे नेरळमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

Leave a comment »