Archive for tension free

तणावमुक्तीचा मार्ग उलगडला!

तणावमुक्तीचा मार्ग उलगडला!

 

‘मानसिक एकाग्रता आणि तणावाचे निर्मुलन या विषयावर शेखर कुंटे यांचे व्याखान शुक्रवारी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदीर मध्ये होते. यावेळी दाखविलेल्या मनशांतीच्या विविध क्रिया. व नागरिकांचा उत्स्फुतर् सहभाग (प्रशांत चव्हाण सकाळ छायाचित्र सेवा)

‘सकाळ’च्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
मुंबई – जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षणोक्षणी जाणवणाऱ्या स्पर्धेत सगळेच पार गुरफटून गेले आहेत. त्यामुळे तणाव नसलेली व्यक्ती मिळणे विरळाच. या ताणातून मुक्ती मिळू शकेल काय, हाच आजच्या पिढीचा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर तोडगा देऊन जनसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी "सकाळ’ आणि "विद्या संस्कार संस्थे’ने शुक्रवारी (ता. 26) प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ प्रा. शेखर कुंटे यांचे "मानसिक एकाग्रता आणि तणावाचे निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. मुंबईतीलच नव्हे तर मुंबईबाहेरूनही अनेक पालक-पाल्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून तणावमुक्तीचा आनंद घेतला.
मुळात तणाव हा नसतोच, तो आपण निर्माण करीत असतो. आपणच आपले मन नकाराच्या अवस्थेत नेत असतो. सगळ्यांचे मन एकाच प्रकारचे असते. त्यामुळे ते एकाच प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जाते. म्हणून तणावांवरचे उपायही समानच असतात, अशी सुरुवात करून प्रा. शेखर कुंटे यांनी उपस्थितांना प्रयोगाद्वारे ताण नसलेल्या अवस्थेत नेले. प्रयोगाशिवाय ताण मुळात का येतो व आलाच तर त्यावर तातडीने कशी मात करता येते, हेही त्यांनी सांगितले. तणावाचा आणि ऍण्ड्रालिनीन स्रावाचा जवळचा संबंध असतो. म्हणून ऍण्ड्रालिनीन कमी करणे म्हणजे तणावरहित होणे. ज्या वेळी ताण येतो, त्या वेळी मेंदूला ऑक्‍सिजनची अधिक गरज असते. अशा वेळी ऍण्ड्रालिनीनचा प्रवाह कसा कमी करता येईल, याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी उपस्थितांना काही सोपे मार्ग सांगितले. पाच ते आठ वर्षे वयातील मुले आनंदमयी कोषात असतात. हा लहानपणाचा आनंद मनाच्या सुप्त कोशात अडकलेला असतो. तणावाचे दुसरे टोक म्हणजे आनंद असतो. म्हणून आपण कल्पनेने त्या सुंदर वयाच्या काळातील प्रसन्न घटनांच्या आठवणीत गेलो आणि त्याला संगीताची जोड मिळाली की आनंदासह तणावमुक्तीचा कसा सुखद अनुभव घेता येतो, याचे प्रात्यक्षिकही प्रत्येक उपस्थिताने केले. काही काळ गतायुष्यातील रम्य वातावरणात संगीताच्या साथीने रमल्यावर मन कसे हलकेफुलके आणि प्रसन्न होते, याचा प्रत्यय प्रत्येकाला आला. याशिवाय, मनाची एकाग्रता कशी विकसित करता येते, याचाही अनुभव उपस्थितांनी घेतला. मुलांच्या शाळा-कॉलेजांतील परीक्षेच्या वेळी या प्रयोगांचा आम्हाला चांगला फायदा होईल, असा विश्‍वासही उपस्थित पालकांनी या शिबिरानंतर व्यक्त केला.

Leave a comment »